पोस्ट 3


POST 3

चला, आता व्हॉट्सॅप डीलीट करून अलमोस्ट पाच दिवस झाले. नव्याची नवलाई संपत आली.

काल एका मैत्रीणीचा फोन आला. ही माझी ऑनलाईन मैत्रीण. आम्ही प्रत्यक्षात भेटलेलो नाही, पण फेसबुक आणि व्हॉट्सॅपवर चिक्कार गप्पा मारल्यात. माझ्याकडे आज गवारीची भाजी आहे इथपासून ते तिच्या नवर्‍याला बाथरूमसमोर पायपुसणं टाकलेलं आवडत नाही इथवर सगळी माझ्याबद्दल तिच्याकडे आणि तिच्याबद्दल माझ्याकडे माहिती आहे. या माहितीचा नक्की काय उपयोग माहित नाही. पण माहिती तरी आहे!! तर अशी ही मैत्रीण माझ्यासोबत बराच वेळ बोलत होती. खूप गप्पा झाल्यावर म्हणाली, “तुझं बरोबर आहे. तू योग्य डीसीजन घेतलास. तुझ्यासारखे खूप सारे लोक असतील, त्यांच्यापर्यंत या अशा पॉझिटिव्ह गोष्टी पोचल्या पाहिजेत. एखादा ना हॅशटॅग चालू करायला हवाय. जेणेकरून लोकांना सोशल मीडीयचे दुष्परिणाम कळतील”
बोलताना तिला अजिबात यामधला विनोद लक्षात आला नाही. तिला कदाचित तो समजलाही नसता. दारूच्या दुकानामध्ये बसून दारूचे घोट घेत अल्कोहोलिक अ‍ॅनोनोमसची मीटिंग घेणं ही कल्पना किती क्रांतीकारी आहे तितकीच #StayAwayFromSocialMedia असा हॅशटॅग चालवून सोशल मीडीयाचे दुष्परिणाम दर्शवणे देखीलच.
मला मग म्हणाली, “तू ना मला एक पोस्ट लिहून दे, मी ती फॉरवर्ड करते”
हे अत्यंत धोकादायक आहे. “चलता है, फॉरवर्ड है, दिल पे मत ले यार” हे अशी वाक्यं कितीवेळा आदळतात? जे काय आहे ते फॉरवर्ड आलेले आहे. त्यावर फार विचार न करता ते केवळ फॉरवर्ड करत जा, एक वेळ हसू आलं नाही तरी चालेल पण फॉरवर्ड केलंच पाहिजे. सुदैवाने, मी व्हॉट्सॅप अ‍ॅडिक्ट झाले तरी फ़ॉरवर्ड अ‍ॅडिक्ट कधीच नव्हते. (मला रोज दारू लागते पण हातभट्टीची नाय चालत!! या धर्तीवरचं हे वाक्य आहे) पण त्याचवेळी हा एक अत्यंत तापदायक प्रकार असतो याबाबतीत दुमत नसावे. (शिवाय मी मनात, ताई, ब्लॉग लिहितेय, तो वाचा किमान. फ़ॉरवर्ड करायची घाई कशाला?)

पण तिच्या वाक्यामधल्या वरकरणी दिसलेल्या विनोदापेक्षा अजून एक विनोद यामध्ये लपलेला आहे. तो म्हणजे झुंडीने विचार करण्याची वाढलेली वृत्ती. एकटी कशाला काय करतएस, Lets Make a a Group and start a conversation. आता हा ग्रूप कितीही उदात्त विचारांनी बनलेला असला तरी त्यामध्ये दुसर्‍या तिसर्‍या विचारांना स्थान नाही. रफी प्रेमी ग्रूपमध्ये असाल तर किशोरचं गुणगान सहन केलं जाणार नाही. इथं केवळ रफी हाच उन्माद. रफी ग्रेट हे मान्य केलंच पाहिजे, पण त्याहून जास्त मान्य केलं पाहिजे की, रफीपेक्षा कुणीच ग्रेट नाही. किंबहुना त्यामधून उन्मादाची एक नवीन वृत्ती सामोरी येते ती म्हणजे विचारच न करण्याची वृत्ती.
मध्यंतरी बालभारतीच्या गणितामधल्या आकडे वाचनावरून आलेले विनोद आठवतायत का? थुकरट हा शब्द त्यांच्यासाठी सौम्य ठरावा अशी अवस्था होती. मुद्दा काय आहे, काय घडलंय हे जाणून न घेता चालू विनोद. राजकारणामध्ये आपला राष्ट्रपती कोण माहित नसलेले लोक ट्रम्प निवडून आल्यावर #NotMyPresident लावून फिरत होते. भारतातले भारतीय नागरिक. मेल्यांनो, तुमचा नाहीच आहे तो प्रेसिडेंट. ज्यांचा आहे ते काय ते बघून घेतील. यावर मला उत्तर असे मिळाले होते की, “तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असला तरीही, त्याच्या अनेक निर्णयांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. याचा आपण विचार केला पाहिजे” अरे वा! जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल आपण चिंता करून नक्की काय बदल होणारे? त्या निर्णयांबद्दल, अथवा त्या कामाबद्दल आपला काही अभ्यास तरी आहे का? यावर मला मी “भक्त” असल्याचा शिक्का मात्र मिळाला. या अशा अनेक चर्चांमध्ये मला कधी कुणी भक्त म्हणतं, कोण हिंदुत्ववादी म्हटलंय, कुणी पाकिस्तानधार्जिणं म्हटलंय, कुणी मुस्लिम लांगुलचालन करणारी म्हटलंय…. हे असं किती आणि काही म्हटलंय. पण का? मला माझी विशिष्ट राजकीय मतं आहेत. ती डिफेंड करावीत अशी माझी इच्छा नाही. समोरच्याने माझ्या राजकीय मतांवरून मला हिणवण्याची गरज तर बिल्कुल नाही. मघाशी मी म्ह्टलं ना “झुंडीने” विचार करण्याची प्रवृत्ती ती नेमकी ही अशी. सोशल मीडीयावर तुमचे ग्रूप बनतात, कंपू बनतात आणि मग सगळेच समानधर्मी एकत्र आलेले असताना त्यामधला वेगळा अत्यंत खुपायला लागतो. वेगळा विचार असलेला माणूस अथवा प्रवृत्ती हिणवण्याची अथवा तिला समूळ नष्ट करण्याची सवयच होत जाते.
माझ्या मते, सोशल मीडीयाचा हा सर्वात धोकादायक दुष्परिणाम. सुदैवाने, मी कधीच कुठल्याही राजकीय सामाजिक वगैरे प्रश्नांबद्दल कधी काही लिहत नाही, अथवा त्या वादावादीमध्येही जात नाही. ते अत्यंत हिणकस वाद वाचले तरी माझ्या मनामध्ये प्रचंड निगेटीव्हीटी साचून येते.
तर बॅक टू पॉइंट 1. पाच दिवसामधला प्रचंड मोठा बदल म्हणजे प्रचंड वेळ हाताशी येतोय. काल परवा दोन पुस्तकं वाचायला सुरूवात केली. एक सिनेमा पाहिला (लक बाय चान्स) सिनेमा आधी पाहिला आहे म्हणून एरवी व्हॉट्सॅप बघत पाहिला असता आणि फेसबुकवर “वॉचिंग लक बाय चान्स” वगैरे पोस्ट टाकली असती. दोन्ही करण्यासारखे नव्हते म्हणून मेकिंग ऑफ लक बाय चान्स पाहिलं!!!

खूप दिवसांनी एका लेकीसोबत बाहेर खायला गेले, एरवी मी फोनवर आणि तिची बडबड चालू. काल दोघींची बडबड चालू. त्यांच्या शाळेमध्ये काल “सारापॉट” आणि “विटूदांडी” असे खेळ बालदिनानिमित्त शिकवले. त्यांना सारीपाट आणि विटीदांडू म्हणतात हे तिला सांगूनही पटत नव्हतं, त्यामुळे माझ्या बुद्धीचा बार खाली आणून तिच्याशी वाद घातला.
फेसबुकवर एरवी नाही तरी काय करत होते इतकी वर्षे?

Comments

  1. Groups are a big hazard
    Cross talks hit alike blizzard
    Never put on table each card
    They make your life hell n hard.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पोस्ट 1

पोस्ट 2