पोस्ट 1


हे लिहायचं की नाही इथपासून सुरूवात आहे खरंतर. पण म्हटलं, किमान नोंदवून ठेवू या. काही नाही तर हाती एक नोंदणी तरी राहील. प्रयोग यशस्वी झाला तरी, अयशस्वी झाला तरी.
तर सांगण्याचा उद्देश इतकाच की, कंप्लीट 36 तास झाले आहेत. मी फेसबुक आणि व्हॉट्सॅप दोन्ही डीलीट करून.
वापरावर कंट्रोल ठेवावा, फार त्यात गुंतू नये हे सल्ले माझ्यासाठी आता उपयोगाचे नव्हते हे कधीच लक्षात आले होते. त्यासाठी अधूनमधून फेसबुक डीअ‍ॅक्टीव्हेट करून प्रयोग करून पाहिला होता. पण फेसबुकपेक्षा व्हॉट्सॅप व्यसन अधिक वाईट होते. अजूनही आहे. आताही पूर्ण त्यामधून बाहेर आले आहे, असे आपण म्हणूयाच नको. अवघे काही तास तर झालेत…
इरादा किमान वर्षभर तरी ही दोन अ‍ॅप्स बिल्कुल न वापरणे आणि वापरले तरी केवळ कामानिमित्त असा आहे.

तर ही अनुदिनी त्या इराद्यासाठी… रोजचा हा प्रवास आणि संघर्ष तुमच्यासमोर मांडण्यासाठी.

तिथवर पोचण्याआधी, मुळात हे पाऊल उचलावे का लागले त्याबद्दल थोडेसे…
सोशल मीडीया आणि मी एकाच वयाचे. माझं टीनेजर चालू झालं तेव्हा याहू ग्रूपशी परिचय झाला. अनोळखी व्यक्तींशी इंटरनेटमधून संपर्क साधण्याचा तो पहिला अनुभव होता. देशाविदेशामधले हे वेगवेगळे याहू चाट रूम्स तेव्हा फार अनोखे वाटले होते. याहू मेसेंजर हा माझ्या टीनेज आयुष्यामधला अत्यंत महत्त्वाचा घटक. त्यानंतर आलं जीटॉक आणि ऑर्कूट. ऑर्कूटने सोशल मीडीयाची व्याख्या बनवली. ऑर्कूट ग्रूपमध्ये तेव्हा माणसं जोडायला सुरूवात झाली होती. माझा तसा ऑर्कूटशी संबंध फार थोडा आला. जीटॉकमध्ये गप्पा मारणे हा मात्र नित्यछंद झाला होता. एक तर, जीमेलमध्येच ही विंडो ओपन असायची. कामं करत असल्याचा बहाणा करत चिक्कार गप्पा मारल्या जायच्या.
त्याचदरम्यान, माझ्या आयुष्यामध्ये मायबोली आली. काहीतरी मराठी वाचण्यासाठी सर्च करत असताना, मायबोली सापडली. मायबोली हा इंटरनेटवरचा मराठी लोकांचा गप्पांचा अड्डा. या मायबोलीनं काय केलं तर मला लिहितं केलं. माझ्या लेखनाची सुरूवात ही अशी ऑनलाईन झाली. इंस्टंट कमेंटची नशा तेव्हा काय भयाण चढत होती. हे सारं नवनवीन होतं, त्यामुळे लोकं खूप कमी होती. मायबोलीनंतर फेसबुक आलं. फेसबुकने आपल्या आयुष्याचा एक कप्पा ऑनलाईन खोलून द्यायला सुरूवात केली.
माझ्यासाठी फेसबुक मायबोलीपेक्षा खतरनाक ठरलं.
पदार्थ केला की ताबडतोब “फोटो” काढून अपलोड केला जाऊ लागला. एखाद्या ठिकाणी फिरत असताना “याची फेसबुक पोस्ट कशी होईल” याचा विचार होऊ लागला. फेसबुकच्या जोडीला आलं व्हॉट्सअ‍ॅप. गंमत वाटेल पण मी अलमोस्ट 2015 पर्यंत व्हॉट्सॅपपासून दूर होते. माझ्या ओळखीमध्ये/कॉण्टॅक्ट्समध्ये कुणी असं नव्हतंच ज्यांच्याशी मी इत्क़का वेळ गप्पा मारू शकेन. चेन्नईच्या वनवासामध्ये मला फेसबुक देत असलेलं अनोळखीपणाचं कोंदण मात्र महत्त्वाचं वाटत होतं.

तरी 2015ला अखेर व्हॉट्सॅप डाऊनलोड केलं. फार काही बदललं नाही, पण वेगवेगळ्या ग्रूपमध्ये इंटरेस्टिंग चर्चा होऊ लागल्या. याचदरम्यान, सोशल मीडीया हा प्रपोगंडाचा अविभाज्य हिस्सा बनला होता. सोशल वरोन हा मीडीया मार्केटिंग मीडीया बनत गेला. धडाधड समीकरणं बदलत होती. आणि या समीकरणामध्ये, मी गुरफटत चालले होते. ऑनलाईन आयुष्य हे आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनलं होतं. आजही आहे. रत्नागिरीमध्ये रहायला आल्यानंतर आजूबाजूची ओळखीची माणसं वाढली, त्यांच्याशी संवाद वाढला. 
त्याचवेळी, ऑनलाईन जगण्यामधला बेगडीपणाही वाढला.
किडनीस्टोनच्या दुखण्यापायी हॉस्पिटलात गेलेले असताना सलाईन लावलेल्या हाताचा फोटो काढून स्टेटसला लावला. जेणेकरून, लोक विचारतील काय झालं. आपल्या आयुष्यामधील प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे, जाहीर केलीच पाहिजे हा अट्टाहास होता. त्याचवेळी, तीच गोष्ट खरी असता कामा नये- असा दिखाऊपणाही होता. नाटक पाहिलं की टाक फेसबुकवर. पिक्चर पाहिलं की टाक फेसबुकवर, पुस्तक वाचलं की… ओह येस. पुस्तकं वगैरे वाचण्याइतका वेळ उरलाच नव्हता. बराचसा कालखंड हा ऑनलाईन राहण्यातच जात होता. अटेंशन सीकींग वाचत गेले. 

पण अतिशय वाईट गोष्ट यादरम्यान घडत गेली. ती म्हणजे, संवादावर वाढलेलं अवलंबित्व. मी मेसेज केल्यावर समोरच्याने ताबडतोब रीप्लाय केलाच पाहिजे. माझ्याविषयी सतत चौकशी केलीच पाहिजे. असा हट्ट वाढत गेला.
मी मुळात सोशली ऑकवर्ड मुलगी. माझ्यासारख्या घराबाहेर बिल्कुल बाहेर न पडू इच्छिणार्‍या मुलीची संवादाची सारी भूक इथंच भागत होती, ते ठिक. पण ही भूक आता बकासुरासारखी वाढत गेली.
सततचा संवाद हा सतत होतच राहिला. 24/7. 

म्हणजे, असं की गप्पा मारायला म्हणून नेहाकडे जायचं आणि प्रीतिसोबत व्हॉट्सॅपवर मेसेजेस चालू. प्रीतिकडे गप्पा मारायला गेल्यावर श्रद्धासोबत चॅटींग चालू. सतत कुठंच कधीच संपूर्ण नसणं हे नॉर्मल होत गेलं. सतत मेसेजेस चेक करणं, मेसेजेस नसतील तेव्हा स्टेटस चेक करणं. तेही नसेल तेव्हा जुने मेसेजेस वाचणं. त्यावर रीप्लाय का नाही हे विचारणं. याला उत्तर आलं नाही की, चिडचिड करणं.
यामधून वाढत गेली अ‍ॅंक्झायटी. फोमो. फीअर ऑफ मिसिंग आऊट. सततचा वाढत गेलेला इम्पेशंस. अधीरपणा. दोन तीन मित्रमैत्रीणींसोबत यामुळे वाद झाले. आपलं चुकतंय हे समजत होतं पण वळत नव्हतं. यावर उल्लेखलेले सारे उपाय करून झाले.
काही होत नव्हतं.
एके दिवशी मैत्रीण म्हणाली, थोडे दिवस व्हॉट्सॅप वापरणं बंद कर.
ती अर्थात विनोदाने म्हणाली. मी त्यानंतर लिटरली तासाभरात दोन्ही अ‍ॅप्स डीलीट केली.
सततचा चालू असलेला संवाद मी थांबवलाय. कारण, मी सध्या पॉझ बटण दाबलेलं आहे. हे पॉझ माझ्यासाठी. मला स्वत:ला शोधण्यासाठी. या बेगडीपणामध्ये कुठंतरी असली मी हरवून गेले आहे. मला स्वत:ला या जंजाळामधून सापडवण्यासाठी. अख्ख्या आयुष्यालाच एक ठहराव देणारी.
तर ही अनुदिनी. माझी फक्त माझ्यासाठी.

पाहू नोव्हेंबर 2020 पर्यंत हा इरादा टिकतो का ते? 



Comments

  1. You've pushed button of pause
    It's utmost important for a cause
    You aren't breaking any social laws
    It's time to hide paws & display claws.

    ReplyDelete
  2. Nandini, i must say ..you are a brave girl -who is ready to see her own self in and out. I am hoping this positive change will enhance your capacity as a Writer.
    All best wishes

    -Sai

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पोस्ट 3

पोस्ट 2